[Ctrl+G for Marathi/English]

प्रादेशिक योजना मंजूर असलेल्या नगरपंचायत क्षेत्रात 1.5 गुंठे क्षेत्राची खरेदी होवु शकते का ? तुकडेबंदी अधिनियम लागू शकतो का?

नवीन कायदा दुरुस्ती नुसार ज्या ठिकाणी प्रादेशिक योजना मंजूर व प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी तुकेबंदी कायदा लागू नाही

नमस्कार साहेब मी भगवान तबाजी शिंदे माझी आव्हाट ता राजगुनगर खेड पुणे येथे माझी वडिलपार्जित जमीन आहे त्या मध्ये माझी महार वतनाची जमीन आहे त्या जागेवर आधीच केंद्र दवाखाना बांधला होता व आता त्या जागेच्या बाजूला आणखी वॉल कंपाउंड चा बांधकाम करत आहे पण मी व माझा वडीलनी असा कोणताच बक्षीस पात्र बनवून दिला नाही ग्रामपंचात मध्ये व ग्रामसेविका सोबत मी विचारणा केली असता कोणताही पत्र मिळालं नाही हि जमीन मला कशी परत मिळेल व योग्य मोबदला कसा मिळेल कृपया करून मार्गदर्शन करावे

सदरची जमीन आपले मालकीची आहे का ? जर आपल्याला जमीन ती वतन जमीन म्हणून दिलेली असेल तर , प्रथम ज्या विभागाने त्या जागेवर दवाखाना बांधला आहे त्यांना वकील मार्फत नोटीस द्या व जमीन वापराबाबत नुकसान भरपाई मागा . तीच प्रक्रिया हॉल ज्या विभागाने बांधला आहे त्या विभागास हि नोटीस द्या . संबंधित विभाग प्रमुख यांना भेटा
नोटीस ला जर काही प्रतिसाद मिळाला नाही तर आपणास न्यायालयात जावे लागेल

मा. महोदय साहेब
माझे नाव . मंगेश लक्ष्मण कुंडे आहे
माझ्या आजोबाच्या नावे ४० एकर जमीन होती पण सन (१९५९ ) ला माझ्या आजोबांचे निधन झाले.त्यांच्या निधनानतर माझ्या आजीचा नाव सात बारा मध्ये लागला आजीचा नाव सातबारा मध्ये एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून लागले होते कारण आमच्या परिवारामध्ये माझी आजीचं सर्वात मोठी होती. त्यामुळे तिचा सात बारा मध्ये नाव लागले होतेआजोबा नंतर आजीचा फेरफार झाला तेंव्हा ( हिस्सा न . ० ) असा होता . १९७२ मध्ये आमच्या जमिनी मध्ये (हिसा न. १ ) झाला आणि त्या जमिनी मध्ये आणखीन १५ नावे लागली आणि ती नावे माझ्या कुटुंबातील नसून गावातील आहेत आणि त्यांनी गट स्कीम मध्ये १९७२ साली नावे लावून घेतली आहेत.
माझ्या आजी मयत झाल्यानंतर तिच्या मुलांची नवे सातबारावर लागणे गरजेचे आहेत ती नावे सुद्धा लागली नाही आहेत आम्ही त्या लोकांना विचारले असता ते बोलले कि तुमची नावे नाही आहेत काही करायचे ते करा तुमच्या आजीचा नाव जमीन कसत नाही म्हणून कमी केले आमच्या फॅमिली मध्ये यांची नावे कशी लागली साहेब

१) एकत्र कुटुंब प्रमुख आजीचे नाव होते तेंव्हा (हिसा न. १ ) झाला तेंव्हा आजीच्या मुलांची नावे न लागत इतर १५ लोकांची नावे गट्स्कीम मध्ये कशी लागली ती आमच्या फॅमिली व्यतिरिक्त इतर लोकांची लागली आहेत त्या साठी काय करावे लागेल १९५६ चा उतारा काढला तेंव्हा फक्त माझ्या आजोबाचा आणि आजीचा सातबारा मध्ये नाव आहेत पण नंतर नवीन सातबारा मध्ये माझ्या कुटुंब मधील कुणाची नावे लागली नाहीत सर काय करावे लागेल

सर्वप्रथम इतर १५ लोकांची नावे गट्स्कीम मध्ये ज्या फेरफार नोंदी ने लागली त्यावर संबंधित मा. उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांचे कडे अपील दाखल करावी

नमस्कार सर, विभागीय आयुक्त पुणे यांनी आदेश दिला त्या आदेशास अपिल कोणाकडे करावयाचे सल्ला द्या.

मा विभागीय आयुक्त यांनी कोणत्या कायद्याखाली आदेश दिला आहे त्या वर अवलंबून आहे . जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या खाली निर्णय दिला असेल तर अपील , शासनाकडे करावे लागेल

नमस्कार ,
माझे वडील २००५ साली मयत झाले त्यांचा परिवार पुढीलप्रमाणे २ पत्नी पहिल्या पत्नीला २ मुले .दुसऱ्या पत्नीला १ मुलगा मी .वडिलांनी त्यांच्या नावाची २.५ एकर जमीन माझ्या आईच्या नवे २००३ साली केली .७/१२ वर आईचे नाव आले.२००५ साली वडील मयत झाले त्यानंतर २.५ एकर सोडून बाकी जमिनीवर दोन्ही पत्नीचे व आम्हा ३ ची नावे अली .२०१६ माझ्या आईचा अकस्मात मृत्यू झाला व आईचे नाव २.५ एकर सोडून बाकी जमिनीवरून कमी झाले.आई च्या नावे जमीन जमीन अधिनियम ८५ प्रमाणे २००३ साली झाले होते .तयारी जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ? त्या २.५ एकर वर बाकी सावत्र भावांचे व सावत्र आई चे नावे लागतील का?ज्या जमिनीवर सगळ्यांची नावे आहेत त्या जमिनीची वाटणी कशी होणार ?जमीन वडिलोपार्जित आहे .
धन्यवाद

२.५ एकर जागा वडिलांची स्व कष्टार्जित होती का वडिलोपार्जित होती ? स्व कष्टार्जित असेल व नोंदणीकृत दस्ताने आपले आईचे नावे विक्री केली असेल तर या मिळकतील आपल्या सावत्र आई चे व सावत्र भावाचे नाव लागणार नाही .मात्र जर जमीन वडिलो पार्जित असेल तर , वडिलांना सर्व २.५ एकर जागा विकण्याचा अथवा आपले आईचे नावे करण्याचा कोणताही अधिकार नाही . वडिलोपार्जित मिळकतीत त्यांचा जेवढा हिस्सा असेल तेवढाच विकण्याचा हक्क आहे होता ,. म्हणजे वडील यांचे शिवाय त्या मिळकतीत आपले दोन सावत्र भाऊ . आपण व वडील यांचा प्रत्येकी १/४ हिस्सा होता . वडील केवळ तेवढाच हिस्सा ( १/४) आपले आई चे नावे करू शकले असते .
दुसऱ्या मिळकतीवर आपले नाव आहे मात्र आईचे नाव कमी झाले आहे . हिंदू विवाह कायद्यानुसार , दुसऱ्या पत्नीला पतीच्या मिळकती मध्ये कोणताही हक्क नसतो . मात्र दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यास मालकी हक्क प्राप्त होतो . त्या मुले आपले नाव अगोदरच लागले आहे .

नासिक मध्ये आई च्या नावे फ्लॅट आहे (नासिक रोड )परंतु माझ्याकडे ओरिजिनल कागतपत्र नाहीत तसेच सोसायटी चे कागतपत्र नाही तरी डुप्लिकेट खरेदी खात व इतर कागतपत्र मला कसे व कुठे मिळतील?

आपण आईचे नावे फ्लॅट ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत केले त्या कार्यालयात डुप्लिकेट खरेदीखत करीता विहित पद्धतीने अर्ज दाखल करावा .

आदरणीय सर,सन १९५६ मध्ये एका डोंगराचे रजिस्टर खरेदीखत करून घेतले होते.व त्यात ताब्याबाबत न्यायालयात दावा दाखल करून ताबा घ्यावा.असे नमूद करण्यात आले होते.परंतु ७/१२ सदरी खरेदी घेणाऱ्याचे नाव दाखल झाले.त्यानंतर न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर दावा फेटाळण्यात आला.अशा वेळी इतर हक्कात जे सर्वसाधारण कुळ होते त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ७/१२ च्या कब्जेदार सदरी एकतर्फी आदेशाने नावे ७/१२ च्या कब्जेदार सदरी लावून घेतली.वास्तविक डोंगरावर कोणाचीच वहिवाट नव्हती.अशा वेळी सदरचे बिनकब्जाचे खरेदीखत उपयोगी आहे किंवा नाही?कारण सदर डोंगर आता भूसंपादनात जाणार आहे.खरेदीखताच्या आधारे मोबदला मिळू शकेल?किंवा कसे?कारण आज रोजी ७/१२ सदरील नावास कंस झाला आहे.कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....

१९५६ साली डोंगर खरेदी करण्यात आला होता त्या वेळी डोंगर कोणाचे मालकीचा होता ? जर सरकारी मालकी असेल तर काहीही उपयोग होणार नाही .
१९५६ साली डोंगर जागेबाबत न्यायालयात वाद चालू होता का ?
आपण ज्यावेळेस प्राथमिक भू संपादन ( Preliminary Notification/notice ) सूचना प्राप्त होईल त्यावेळेस आपण आपली हरकत नोंदवा . जेणेकरून नुकसान भरपाई वाटप या वेळेस संबंधित भू संपादन अधिकारी आपली हरकत विचारात घेतील व आपण डोंगराचे मालक असाल तर , आपणास नुकसान भरपाई देतील .
नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपणास आपली मालकी सिद्ध करावी लागेल .

सर नमस्कार ,
सर माझ्या आजोबांनी कुळ कायद्यात जमीन कसून मिळवली होती , आजोबांचा म्रुत्यु सन 1981 साली झाला , त्या नंतर वारस म्हणून 3 मुळे व 1 मुलगी म्हणून नोंद झाली ,
जमीन ही आत्याच्या , काकांच्या व वडिलांच्या नांवे होती , कुळ कायदा हा शेरा कमी झाला नव्हता ,
एका खरेदी दाराला ती जमीन पाहिजे होती म्हणून त्या खरेदी दाराने , वरील वारसांना घेऊन ती जमीन विकत घेतली , वरील वारसाची मुळे ही 18 वर्ष पूर्ण होती ,
खरेदी दाराला ती मुळे जमीन विकत नव्हती म्हणून त्यांने त्याच्या वडिलांन कडून जमीन विकत घेतली , वडिलोपार्जित जमीन होती वारस हक्का प्रमाणे नातवानांची सहमती घेतली नाही , नातवंडाचे नुकसान झाले आहे ,
काय करावे , सर सांगा , व वडिलांनी जमीन विकल्या मुळे वडिलांचे काही दुखापत होऊ शकेल काय ,
माहिती द्या सर , भरपूर उपकार होतील आपले , आजोबांच्या नातवंडान वर व त्यांच्या लहान लहान मुलानं वर , माहिती द्या सर काय करू ,

आजोबा या मिळकतीचे कुल होते . आजोबांचे पश्श्चत आपल्या वडिलांसह दोन काका ( चुलते ) व आत्याचे नाव मिळकतील लागले . वडिलांनी ती जमीन त्रयस्थ व्यक्तीस , वरील वारस यांचे वारस यांची संमती न घेता विकली त्या मुले आपले नुकसान झाले असा आपला प्रश्न आहे .
नातवंडांची संमती घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही

१) आमच्या वडिलांच्या नावे 7/12 सदरी 20 गुंठे जमीन असून ते सन 2011 साली मृत्यू पावले, त्यांना वारस म्हणून आम्ही त्यांची 3 मुले होतो, पैकी आमचा मोठा भाऊ सन 2006 साली मृत्यू पावला आहे, आम्ही अजून वारस नोंद केली नसून जमीन वडिलांच्या नावावरच आहे, आता सदर जमीनवर आम्हा 2 भाऊ आणि आमच्या मयत भावाच्या पत्नीस वारस नोंद घेणे आहे, त्या करीता अर्ज कोणाला करावा, काय कागदपत्रे जोडावीत याकरिता मार्गदर्शन करावे.
2) तसेच सदर जमिनीचे 3 समान हिस्स्यात वापटही करणे आहे, सबब 7/12, 8-अ आणि फेरफार नोंद घेणे आवश्यक आहे, याबाबतही मार्गदर्शन करणे ही विनंती.

तलाठी यांचेकडे अर्ज करा . त्या सोबत आपल्या सर्व वारसांचे प्रतिज्ञा पत्र सादर करा .जो भाऊ नयेत आहे त्याच्या पत्नीसह त्याच्या मुलांचीही नावे , ( १/३ हिस्सासाठी) लावणे आवश्यक आहे
तिघांची नावे लागल्या नंतर , जमीन वाटपासाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

माझ्या वडिलांनी सन 1998 साली गावातील सी.स.नं. ६८५ आणि ६८६ वरील मिळकत (दगड मातीचे घर) नोंदणीकृत खरेदी खताने एका एसमाकडून विकत घेतली होती. ग्रामपंचायतीत माझ्या वडिलांच्या नावाची नोंद असून आज रोजी पर्यंत घरपट्टी, पांणीपट्टी, दिवाबत्ती आकारणी पावती माझ्या वडिलांच्या नावे दिली जात आहे. कालांतराने उक्त मिळकतीच्या गाव नमुना ७/१२, ८-अ आणि मिळकत पत्रिकेवर माझे वडिलांच्या नावाची नोंद नसल्याचे माझे लक्षात आल्याने वडिलांच्या नावाची नोंद होणेकरिता वडिलांच्या स्वाक्षरीसह अर्ज/कागदपत्रे मा. जिल्हाधिकारी, सांगली यांना सन २०१६ साली सादर केला. अर्जानुसार उप अधीक्षक, भूमी अभिलेख, पलूस यांनी सदरहू मिळकतीवर १९७७ च्या नॊंदीने धारक सदरी बिगर परवाना बिनशेती अशी नोंद असून खरेदी देणार यांचे नाव धारक सदरी दाखल नसल्याने अर्जानुसार नोंद करता येत नाही, जरूर तर सदर मिळकती बिनशेती करून घेऊन बिनशेती आदेश आणि मंजूर रेखांकन सादर केल्यास नोंदीची पुढील कार्यवाही करता येईल, असे कळवले आहे. त्याच प्रमाणे तलाठी साहेब यांच्याकडे कलम 149 नुसार अर्ज केला असता, दस्तात सी.स.नं. नोंद असून खरेदी देणार यांचा 7/12 चा गट नंबर नमूद नसल्याने माझे वडीलांचे नाव 7/12 सदरी दाखल करता येत नाही. भविष्यात मालकी हक्कांबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून योग्य मार्गदर्शन करावे

सिटी सर्वे होताना , ज्याचे कडून जमीन खरेदी केली त्याचे नाव लागले नव्हते का ? प्रथम मिळकत पत्रीकेस ज्याच्याकडून आपण जमीन खरेदी केली त्यांचजे नाव लागणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा . त्या सोबत जयचेकडून जमीन खरेदी केली त्याचे हि मालकी कागद पत्र ( ग्राम पंचायत अभिलेख ) जोडा .

आदरणीय सर
आमचे जागेला पश्चिमेकडील बाजुला लागुन सार्वजनिक रस्ता आहे, नविन घर बांधताना पश्चिमेकडील रस्त्यालगतची २ फूट रुंद ६० फूट लांब जागा सोडून घर बांधले आहे, नविन रस्ता करताना ह्या जागेतूनही रस्ता तयार केला आहे जर आम्हाला भविष्यात या जागेवरून संरक्षक भिंत बांधायची असेल तर काही सरकारी अडथळा येऊ शकतो का?

आपली जागा ज्या नियोजन योजनेत सामाविस्ट आहे त्या नियोजन योजनेचे बांधकाम नियंत्रण नियमावली लागू होईल . त्या नियंत्रण नियमावलीनुसार किती अंतर रस्त्या पासून बांधकाम करताना सोडावे लागेल हे तपासावे . जर त्या अंतरात बांधकाम येत असेल तर , निश्चित आपण बांधकाम करू शकणार नाही

सर आम्ही 15 वर्षी पूर्व एका इसमास माजी शेतजमीन विकली असून सदर इसमा कडून तलाटया कडे खरेदी खत नोंद ( फेरफार नोद ) केली गेली नाही तरी त्या इसमास काही कारणास्तव आम्हास ती जमीन त्याला द्याची नाही ( खरेदी खत केनसल ) कारन्या साठी काय करावे लागेल

सागर राव
जमीन तुम्ही नोंदणीकृत दस्ताने विकली असल्यास , आता आपण काहीही करू शकत नाही .

प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.

एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता

सर, निलंबन आदेशा विरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास जिल्हा परिषदेला कर्मचाऱ्याला पुनर्स्थापित करता येते का?

उच्च न्यायालयाचे कोणते स्थगित आदेश नसल्यास , पुनर्स्थापित करण्यास कोणतीही बाधा नाही

नमस्कार सर माझी आई परगंधा आहे म्हणजे घरातून २२ वर्षा पूर्वी निघुन गेली आहे त्याची नोद पोलिस स्टेशन ला केलेली नाही माझ्या आई चे १५ वर्षा पूर्वी वडील वारले आहे त्यांच्या नावावर असणारी सर्व जमीन ४ मामा नी त्यांच्या नावावर केली व त्यातील बरीच जमीन त्यानी विकाली आहे ७/१२ वर वारसदार म्हणून आई चे नाव नाही तर मला त्यात माझ्या आई चा वारस म्हणून मला जामिनीचा अधिकार मिळू शकतो का आणि जर मिळत असेल तर त्यासाठी काय करावे

आई परागंदा असले बाबत प्रथम तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करा .
आपली आई परागंदा आहे म्हणजे ती अजून हयात ( still alive ) असा होता . त्यामुळे प्रथम आई चे नाव दाखल करून घ्या . त्यासाठी जय फेरफाराने केवळ मामांचे नाव दाखल आहे तो प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा .
आई ची तक्रार दाखल करून ७ वर्षे झाल्यावर , आई चे वारस म्हणून आपले नाव दाखल होईल

सर
फेरफार नंबर 23339मधील नोंदी बाबत जुना 6ड न बघता नवीन 6ड वर मालकी चा केला व विक्री वेळी जुने कागद पञ न बघता खरेदी विक्री केली त्यानी आता आम्हा ला नोटीस आलीच नाही मी शेजारी असुन आता माझे क्षेत्रापरमाणे भरत नाही मी ऑनलाईन तक्रार टाकली मंडळ अधिकारी यांनी आम्हाला 3तारखा दिल्या पण आम्हा ला आदेश दिला आता उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपिला मधे जाणेच आहे किती दिवस असतात

६० दिवस
जर आपला प्रश्न क्षेत्र बाबत असेल तर , मंडळ अधिकारी अथवा प्रांत अधिकारी काही करू शकणार नाही . लेखन प्रमाद अथवा जाणीव पूर्वक केलेली चूक असेल तरच , उपरोक्त अधिकारी यांचा प्रकरणातील हस्तक्षेप उपयोगी पडेल अन्यथा आपणास भूमी अभिलेख खाते यांचे दरवाजे ठोकावे लागतील

नमस्कार सर,

माझा शेतजमिनी विषयीच्या रेकॉर्ड्स संदर्भात प्रश्न आहे.
सर माझ्या पंजोबना २ मुले होती. त्या २ मुलांच्या नावावर समान शेतीचे क्षेत्र १९७२ परेंत होते. पण १९७२ साली आमचा शेतीचे सर्वे भुमिअभिलेख मार्फत बदलले गेले होते,
त्यामध्ये एका सर्व नंबर चे रुपांतर दोन सर्वे नंबर झाले आहेत.
त्या दोन सर्व नंबरचे योग्य फेरफार झाले होते. पण एका सर्व नंबर मध्ये दोघांच्या नावावर समान क्षेत्र होते, तर दुसऱ्या सर्वे मध्ये ते क्षेत्र एकाचा नावर लागलेलं आहे पण त्याचा फेरफार मध्ये दोघांची हि नावे आहेत. पण तालाठीने सातबारा नोंद घालताना चूक केली आहे.
नंतर ज्या सर्वे मध्ये चूक झाली आहे तो सर्वे च्या प्लॉट चुलत आजोबाने दुसऱ्याला विकला,.
अशाप्रकारे.. आमचा आजोबांच वाट्याला कमी जमीन आलेली आहे.
तर ह्याजमिनीची रेकॉर्ड्स ची चूक सुधाण्यासाठी काय करावे
लागेल? कोर्ट केस करून जमीन मिळेल की हे मार्गदर्शन करावे

आपले प्रश्नावरून , आपले गाव मध्ये एकत्रीकरण योजना अमलात आलेली आहे . त्यामुळे आपण म्हणता त्या प्रमाणे एका भू खंडला केवळ एकाच आजोबांचे नाव लागले आहे . याला चूक म्हणता येणार नाही .
आपण हे हि म्हणता कि , तलाठी याने , फेरफारामध्ये , दिघंची नाव असताना , ७/१२ सादरी चुकीचा अंमल दिलेला आहे . अशी वस्तू स्थिती असेल तर , चूक दुरुस्त करता येईल . आपण तहसीलदार यांचेकडे कलम १५५ खाली अर्ज करा

महोदय
खालील अपिलाच्या निर्णयाची प्रत मेल वर मिळावी हि विनंती
मा. मंत्री (महसूल) यांचे न्यायालयात क्रमांक आरटीएस-२८१७/प्र.क्र. ७८२/ज-४ अ
आपला विश्वासू
सुरज कदम

कृपया अशी माहिती विचारू नये
प्रश्नांना माहिती /उत्तरे दिली जातात
माहितीच्या अधिकारप्रमाणे , अभिलेख या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात नाही

मा. किरण पाणबुडे साहेब

माझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1914 सालाचा आहे. (जुन्या जन्मनोंदीनुसार), माझ्या आजोबांचे मामा बापु खामगळ यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी माझ्या आजोबांना ते 10 वर्षाचे असताना दत्तक घेतले होते. (दत्तक पत्र वगैरे नाही). व त्यांचे नाव शंभु बापू खामगळ असे ठेवले होते. पुढे काही कालावधीने आजोबांचे मामा मयत झाले, त्यांच्या नावावरील 1 एकर जमीन माझ्या आजोबांच्या नावावर आली, माझ्या आजोबांना त्यांच्या मामांच्या मृत्यूनंतर पुन्हा माझे पणजोबा त्यांच्याकडे घेऊन आले, व पुन्हा त्यांचे नाव शिवराम तात्या शिर्के असेच राहिले, जे आजपर्यंत आहे. वरील सर्व माहिती आजोबांनी सांगितलेली आहे. 1 महिन्यापूर्वी माझे आजोबा मयत झाले आहेत, त्यांचे सर्व कागदपत्रे शिवराम तात्या शिर्के नावांनी आहेत मी त्यांच्या मृत्यूची नोंद करणेकरिता ग्रामसेवकास भेटलो असता मी त्यांच्याकडे शिवराम तात्या शिर्के उर्फ शंभु बापू खामगळ अशी नोंद लावण्याची विनंती केली असता त्यांनी नकार दिला. ते शिवराम तात्या शिर्के या नावाने नोंद करण्यास तयार आहेत. पण मला दोन्ही नावांच्या नोंदी मृत्यू दाखल्यावर हव्या आहेत, कारण आजोबांच्या नावावर 1 एकर जमीन आहे.
तरी मी काय करावे याची माहिती द्यावी.

आजोबांचे नावात बदल आपणास करता येणार नाही .
प्रश्न आपले नाव मिळकतीस लागण्याचा आहे . आजोबांचे जे वारस ( वर्ग १ ) असतील त्यांची नावे लागतील . वर्ग १ वारस मयत असतील तर , अश्या वारसांचे , वारस यांची नावे लागतील .

आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती

1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,

scanned फेरफार पोस्ट करा

१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी

history file भेटू शकणार नाही .

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .

1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे

2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात

जुने अभिलेख मिळत नसतील तर आपण पुराभिलेख विभागात मिळते का पहा ?
जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख कक्षात ते मिळते का पहा ?

साहेब नमस्कार,

१९ ६१ साली वीर धरण प्रकल्प साठी संपादित केलेल्या शेत जमीन आणि गावठाण भूखंड ची मागणी आता २०१९ साली केल्यास कोणते कायदे तथा जी आर , परिपत्रके द्व्रारा खालील प्रश्नांचा निर्णय दिला जाईल, १९६१ चा अथवा १९९० चा, किंवा अन्य?? त्या वेळी भूसंपादन अधिनियम १८९४ द्वारे संपादन केले होते. त्या नंतर अनेक वेळा पुनर्वसन कायदे बदलत गेले आहेत.

१) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पर्यायी शेत जमीन वाटप बाबत कमाल आणि किमान मर्यादा ठरविणे बाबत
२) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नवीन गावठाण मध्ये पर्यायी गावठाण प्लॉट वाटप बाबत कमाल आणी किमान मर्यादा
३) या बाबत जी आर व परिपत्रके शासन निर्णय मध्ये उपलब्ध नाहीत. मुंबई मध्ये कसे मिळतील?

आपण मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

धन्यवाद

अजय चव्हाण, मुंबई

वीर धरणासाठी जमीन संपादन आपले म्हणण्यानुसार १९६१ साली करण्यात आलेले आहे . पहिला पुनर्वसन कायदा १९७६ साली अस्तित्वात आला . त्यामुळे या संपादनासाठी पुनर्वसन कायदा लागू केलेला नसेल . मात्र महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९६९ अन्वये , आपण जिल्हाधिकारी यांचे कडे , जमीन मागू शकता

वडिलांनी गावातील एका व्यक्ती कडून जमीन तोंडी खरेदी करून (दस्त न करता) त्या इसमास पैसे दिले. गावातील ओळखीचा आहे म्हणूण विश्वासाने पूर्ण पैसे दिले. नंतर माहित पडले कि त्या जमिनीवर ७०,००० हजार IDBI BANK चा बोजा आहे. परंतु बोजा १ लाख पेक्षा कमी आहे. तरी त्या ७/१२ वर IDBI बँकेचे ७०,००० हजाराचा बोजा नमूद केला गेला आहे.
RBI च्या २०११ च्या परिपत्रकानुसार १ लाखांपर्यंतचा बोजा ७/१२ मध्ये नमूद नाही केला जात.
मूळ मालक बोजा भरू शकणार नाही. तर तो बोजा चूक दुरुस्ती फेरफार ने काढता येईल का?

जर जमीन आपले नावावर नाही तर हा खटाटोप कश्यासाठी . ? जर जमीन आपणास खरेदी करायची असेल तर , दस्त नोंदणीकृत करणे आवश्यक आहे .
दुसरे , कर्जाची नोंद / बोजा काढला म्हणून कर्ज फेडले असा होत नाही . जमीन आपले नावावर झाल्यावर , आपणास बॅंकचे कर्ज व्याजासह भरावे लागेल . त्यापेक्षा त्या व्यक्तीला कर्ज रक्कम भरण्यास सांगा

नवीन अविभाज्‍य शर्ती नुसार जमीन विक्री माझ्या आजोबाची शेती हि माझ्या नावे (नातू) करायची व बक्षीस पत्र केले आसता तर ती मुलकी पाटील इनामाची आहे असे सांगण्यात आले असेल.सदर जमीन विक्री करावयाची झालेस महाराष्‍ट्र शासन‍ परिपत्रक क्रमांक /वतन/1099/प्र.क्र./233/ल-4 दिनांक 09/07/2002 प्रमाणे परवाणगी घ्‍यावी लागणार नाही अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

सर माझा आजोबांनी 2013 साली एका व्यक्तीला नोंदणीकृत दस्ताने जमीन विकली असून त्यावर 11 गुंठे नोंद आहे तर ती जमीनीची नोंद तुकडे जोड बंदी कायद्याद्वारे रद्द करता येते का दुसरी गोस्ट त्या जमिनीचा उताऱ्यावर बोर ची नोंद आहे.तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्या दस्ताचा आधारे 7/12 वर नोंद ओढलेली आहे.तरी या कायदयचा आधार घेऊन ही नोंद रद्द करता येते का याबाबद्दल मार्गदर्शन हवे आहे.

जमिनीचे स्वरूप काय आहे त्या वर अवलंबून आहे .
बागायत जमीन असले तर साधारण पणे मर्यादा ५ आर , एकपिकी असेल तर १५ आर व वरकस असेल तर प्रमाण २० आर आहे . हे प्रमाण जिल्हा निहाय वेगळे आहे .
नोंद २०१३ सालची आहे . जर तहसीलदार यांनी कारवाई केली तर , जमीन शाशन यांचेकडून जप्त होईल व आवश्यकतेप्रमाणे शासन कडून संपादित होऊ शकेल . मात्र आपणास जमीन परत मिळणार नाही

एका व्यक्तीकडून दुकान भाड्याने घेतले होते 3 वर्षयाच्या करारावर परंतु व्यवसाय न चालल्यामुळे 6 महिन्यात आम्ही दुकान सदर मालकाच्या ताब्यात दिले आणि डिपॉसीट म्हणून दिलेले 150,000 रुपये चेकच्या स्वरूपात घेतले परंतु चेक बोउन्स झाला म्हणून कोर्टात केस चालू आहे एक वर्ष झाले तरी केस चालू आहे तर लवकरात लवकर केस निकाली लागण्याकरिता काय करावे लागेल?

मला ७/१२ विभक्त करायचा आहे तरी मला प्रक्रिया सांगा

७/१२ दोघांचे नावावर आहे का ?
कृपया आकारफोड पत्रक करून घ्या . आकार फोड पत्रकांचे आधारे , ७/१२ विभक्त होईल

आदरणीय सर,म.न.पा.हद्दीत आम्ही बिनशेती परवानगी घेतली असून आम्हास बांधकाम परवानगी मिळाली आहे.त्या जागी पूर्वीची खाजगी विहीर आहे.सदर विहिरीवर आम्हास स्लॅब टाकावयाचा आहे.व पाणी घेण्यापुरती आम्ही त्यावर झाकण करणार आहोत.तरी यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....

आपणास बांधकाम परवानगी दिली आहे . त्यात या बाबत उल्लेख असेल . आदेश बघून घ्या

खाजगी विहीर आहे . त्या विहिरीवर कोणाचा पाणी घेण्याचा अधिकार आहे का ? अधिकार नसल्यास , आपण विहित बंद करू सःक्ता . त्या साठी परवानगीची गरज नाही

गावठाण क्षेत्रात घर, आंगण व परिसदर मिळून जास्तीतजास्त किती जमिनीवर एखादा व्यक्ती हक्क सांगू शकतो, या बाबतीत काही कायदा आहे का???

ग्राम पंचायत कार्यालयात , घराची नोंदणी होताना , क्षेत्राचा तपशील नोंदवलेला असतो . क्षेत्र प्रमाणे , ताबा त्या व्यक्तीचा असतो

माझ्या बाबांना मिलिटरी रिटायर्ड झालेवर सरकारी जमीन मिळाली आहे
तसेच माझ्या वाडीतील एका व्यक्ती ला सुदधा सरकारी जमीन मिळाली आहे सर्वे नंबर एकच आहे
सातबारा उतारा सुद्धा एकत्र मग ती जमीन वेगवेगळी कशी करता येईल

जिल्हाधिकरी यांचे जमीन प्रदान आदेश बरोबर , क्षेत्राचा नकाशा देणे आवश्यक होते . आपण जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून दोघांचे क्षेत्र विभागून ( ७/१२ स्वतंत्र करून ) देणे बाबत अर्ज करा

नमस्कार सर , आमच्या शेतातून मुख्यमंत्री ग्राम सडक मार्ग जात आहे, आमच्या उताऱ्यामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही तसेच गाव नकाश्यामध्ये सदर रस्त्याचा उल्लेख नाही, आता रस्ता ३० फूट रुंदीने वाढत आहे यामध्ये आमचे १ एकर क्षेत्र रस्त्यात जात आहे तरी यासाठी काही मोबदला मिळेल का किंवा नुकसान भरपाई कशी मिळवली जाईल.

घटनेच्या अनुच्छेद ३१ अ नुसार , नुकसान भरपाई दिल्याशिवाय , जमीन संपादन करता येत नाही अथवा त्या व्यक्तीकडून जमीन काढून घेता येत नाही .
संबंधित विभागास नोटीस पाठवून , नुकसान भरपाई मागा , अन्यथा न्यायालयात दावा दाखल करा

माझ्या मोठा भाऊ वडील असताना संपत्तीचे हिस्सा मागत आहे तर त्याचा पूर्ण हक्क सोड करण्यासाठी किती खर्च येईल आणि काय करावे लागेल

वडिलांना जमीन त्यांचे वडिलांकडून आलेली असेल तर , भावाची मागणी रास्त आहे . मात्र वडिलांची मिळकत स्वकष्टार्जित असेल तर , भावाला जमीन मागता येणार नाही .
वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपास अल्प खर्च आहे . २०० रुपयेच मुद्रांक शुल्क लागते . दस्त करून नोंदणीकृत वाटप करून घ्या

खरीदीखता ने बिगर शेत जमीन नावे करण्यास अर्ज दिला आहे तर त्या नुसार फेरफार नोंद दाखल किती दिवसात करण्याचा नियम आहे व त्यासाठी तलाठ्याकडे किती रूपये भरावे लागतील.आणि जर तलाठ्याने एका महिण्यात नोंद केली नाही तर तक्रार कोणाकडे करावी.

नोंद मंजूर करण्यास १५ दिवसाचा कालावधी आवश्यक आहे
तलाठी टाळाटाळ करत असेल तर , तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

१५ गुंठे शेत जमीन सार्वजनिक संस्थेंस दानपत्रा ने हस्तान्तरित करता येईल का


या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे तुकडे बंदी कायद्याची बाधा , खालील किमान क्षेत्राचे हस्तान्तरं करण्यास आहे
5 आर - बागायत
१५ आर - एक पैकी
२० आर - वरकस
मात्र हे प्रमाण जिल्हानिहाय वेगळे आहे . तपासून घ्या .

आदरणीय सर,वसुली व विक्री अधिकारी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील जप्ती आदेशाने का.तलाठी यांनी जमीनदाराच्या ७/१२ तील इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद घेतली आहे.सदर आदेशाच्या नोंदीवर संबंधितास का.तलाठी यांचेकडे तक्रार अर्ज दाखल करता येईल का?किंवा कसे ? कारण संबंधित तलाठी तक्रार दाखल करून घेत नाही.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..

तलाठी यांनी वसुली अधिकारी यांचे आदेशाने , जप्त केले बाबत नोंद घेण्यात आलेली आहे . त्या विरुद्ध तलाठी यांचे कडे तक्रार करता येणार नाही. प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा

दि.११/१०/१९८० रोजी फेरफार क्र.१०४६ अन्वये खातेदार श्री.पांडू रामजी सुर्वे मयत झाले असुन त्यांचे वारस पत्नी-भागीबाई पांडू सुर्वे व मुलगी एकच – शेवंतीबाई पांडू सुर्वे त्यानंतर दि. १९/११/२०१९ रोजी फेरफार क्र. १४८८ प्रमाणे खातेदार श्रीम. भागीबाई अनंदी पांडु सुर्वे मयत झाले असून त्यांना वारस मुलगी एकच – वैजंयती रामजी कानसे असे आहे. वैजंयती रामजी कानसे यांचे लग्नापुर्वी चे नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे असे आहे. शेवंतीबाई पांडू सुर्वे व वैजंयती रामजी कानसे या दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहे. ७/१२ सदरी चुकीने दाखल झालेला लग्नापूर्वीचा नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे कमी करण्यास काय करावा ?

शपथ पत्र दाखल करून तहसीलदार यांच्छेकडे अर्ज करा

नमस्ते सर सर माझी जमीन धरणाच्या बँक वॉटर मध्ये संपा दित होत आहे तर माझ्या जमिनीत अजून 2 हिस्सेदार आहे तर आमची आणे वारी झालेली नाही व माझ्या हिस्सावर जी जमीन आहे तीचा पूर्ण हिस्सा जात आहे व जे 2 हिस्सेदार आहे त्यांची कमी जमीन जात आहे तर आम्ही जो मोबदला मिळेल तो कसा वाटायचा

आपले हिस्सेदार नटे संबंधातील आहेत कि त्रयस्थ आहेत ? जर त्रयस्थ असतील तर , खरेदी खतात क्षेत्राचा तपशील समाविष्ट असेल . क्षेत्राचा तपशील समाविष्ट नसेल तर मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ प्रमाणे , ज्या प्रमाणात आपण खरेदी मंडळ विक्रेत्यास दिला त्या प्रमाणात , क्षेत्र विभागणी होईल .
संबंधित भू संपादन अधिकारी या बाबत निर्णय घेतील . जर चुकीचे apportionment केले तर , नोटीस आल्यावर हरकत घ्या

गावातील गावठाण मध्ये माझ्या वडिलांच्या नावावर मोकळी जागा आहे. माझ्याकडे 1965 पासून ते आता पर्यंतचे त्या मिळकत क्रमांकाचे 8 अ उतारे आहेत. परंतु ग्रामपंचायत त्याजागेवर आपला हक्क सांगत आहे. आणि त्यांना आमच्या नावावरील उताऱ्याबद्दल विचारले असता ते तुमची जागा ती नसून दुसरीकडे असेल असे उत्तर देत आहे तर त्याला पर्याय काय आमची गावठाण मधील जागा आम्ही कशी शोधायची.

गावाचे भू सर्वेक्षण ( सिटी सर्वे ) झाला आहे का ? म्हणजे गावठाणातील जागांचा मिळकत पत्रिका उतारा आहे का ? असल्यास आपणास भूमी अभिलेख खात्यात त्या जागेचा सर्वेक्षण नकाशा मिळेल .
नसल्यास , मोकळ्या जागेवर आपला ताबा आहे हे दाखवणारा काही पुरावा आले का ? जशे कुंपण करणे , काही सामान ठेवणे . जागेची घरपट्टी भरलेली असल्यास , त्याच्या पावत्या .
ह्या पुराव्याच्या आधारे आपण , जागेवर पुढील विकास करा . ग्राम पंचायतीची त्यासाठी परवानगी मागा. परवानगी नाकारल्यास , विकास तरीही सुरु ठेवा . त्यास ग्राम पंचायतीने प्रतिबंध केल्यास , त्यांचे विरुद्ध , न्यायालयात दावा दाखल करा

१)सर नोटरी आणि रजिस्टर अफिडेट यातील फरक काय?
2)हे दोन्ही चा कालावधी (validity ) किती दिवस चालते?

दस्त/अभिलेख notorize हा नोटरी कडे होते . affadavit हि नोटरी तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांचे कडे होते . कायदेशरी पुरावा म्हणून दोनीही मध्ये फरक नाही

1)ग्रामपंचायत हद्दीतील -वस्ती मधील 50 वर्षे पूर्वीपासून अस्तित्वात असणारा रस्ता ग्रामपंचायतकडे हस्तांतरित झालेला नसेल,
तो रस्ता ग्रामपंचायतने 10 फूट रुंद डांबरीकरण आणि नंतर काँक्रिटीकरण केलं असेल आणि
गावकऱ्यांना वापरासाठी तो एकमेव रस्ता असेल तर अशा रस्त्याची नोंद सरकार दफ्तरी होण्यासाठी कोणता नियम/कायदा आहे का ?

रस्ता ग्राम पंचायतीकडे हस्तांतरित करणे म्हणजे सरकारी दप्तरी नोंद करणे

सर,माझ्या पत्नीची माय आजी तिची जमीन माझ्या पत्नीच्या नावे करू इच्छिते.आजीला एकच अपत्य आहे.ती म्हणजे पत्नीची आई.दोघीही ह्या बाबतीत स्वेच्छेने तयार आहेत.तर हक्कासोड किंवा बक्षिसपत्र करता येईल का.आणि सर्व जण आदिवासी समाजाचे ,रक्ताच्या नात्यातले आहेत.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

आजी ला जमीन तिचे वडिलांकडून /आई कडून प्राप्त झाली असल्यास २०० रु मुद्रांक शुल्क भरून नाव वर करता येईल
मात्र आजीची स्व कष्टर्जित असेल तर , जमीन बाजार भावाच्या ३ % मुद्रांक शुल्क भरून , बक्षीस पत्र आपले नावा वर करता येईल

माझे पणजोबा १९६८ मध्ये वारले. वारस रजिस्टर १९७१ साली होऊन जमिनीसाठी ६३ या नंबराच फेरफार तयार झाला पण हा फेरफार no 63 तहसील ऑफिस आणि तलाठीऑफिसमध्ये मध्ये आढळ होत नाही ते कर्मचारी पानं फाटल्याचे सांगतात. पण मला दिवाणी कामासाठी तो फेरफार नक्कल हवी आहे. कशी मिळवू ?

माझ्या आईच्या चुलत भावाने माझ्या आजीची जमीन त्याच्या १३ वर्षाच्या मुलाच्या नावाने केली आहे. त्याच्या म्हणण्या नुसार १९९९ साली खरेदी केली आहे. तो मुलगा आता ३२ वर्षाचा आहे. माझ्या आजोबांचे १९९६ ला निधन झाले. ही वडिलोपार्जित शेती आहे. हा व्यवहार बेकायदा ठरू शकतो का कुठे दाद मागावी ? कृपया मार्गदर्शन करावे

आजोबांची जमीन होती . आजोबांचे निधनानंतर , आजीचे नावावर झाली . त्या नांतर , त्याचे म्हणण्यानुसार , आजीने खरेदी ने दिली . खरेदी खात झाले आहे का ? हे पहा . झाले असल्यास आजीस केवळ तिचा हिस्सा विकत येऊ शकतो . आजीशिवाय आपली आई व अन्य सरळ उतरते वारस , यांचा हिस्सा आजी विकू शकत नाही . दावा दाखल करून जमीन आपल्यायाला मिळू शकते . स्तहनिक वकिलांचे सल्ल्याने पुढील कारवाही करा

माझे वडील १९९८ ला वारले ,मला आई व ३ बहिणी आहेत ,त्यात १ व २ बहिणी चे लग्न नाही झाले , ३ नंबर बहिणीचे लग्न झाले आहे ती चे नाव ७/१२ मधून काडून टाकाय चे आहे ती ची मुले हक्क सोड पत्र करून देण्या साठी नकार देत आहे . तर काय करावे लागेल ?
१] हिंदू उत्तराधिकारी अधिनियम २००५ वापर होईल का ?
२] शेत जमीन न देता मोबदला किती द्यावा व ते कुठून माहिती करावे ,ते दलाला मार्फत मोबदला खूप मागत आहेत ?
३] कोर्टात न जात काय करावे लागेल ?

२००५ चा कायदा , वाटपासाठी लागू आहे . नाव कमी करता येणार नाही

नमस्कार सर,
माझ्या मालकी हक्काच्या मिळकतीत एका गावगुंड्या ने अतिक्रम करून माझा रहदारीचा रस्ता बंद करून माझी ६ गुंठे जमीन बळकावली , या संबंधी मी तहसील कार्यालयात सर्व जमिनीचे व अतिक्रमण झाल्याचे व हद्द मोजणीचे पुरावे दाखल करून तक्रार केली , तहसील कार्यालया मार्फत चौकशी करून सदर कुंपण काढून टाकण्या बाबत त्याला आदेश देण्यात आला , आदेश देऊन २ वर्ष झाली पण त्याने कुंपण काढले नाही , या कालावधीत मी दोन वेळा पोलिसात तक्रार केली, पण पोलिसात येऊन " मला तहसीलदार कार्यालयाचा आदेश मिळालाच नाही ,आदेश मिळाला की मी कुंपण काढून टाकेन " अशी कबुली जबाब त्याने दिला , आत्ता मी या गावगुंड्या ला तहसीलदारां मार्फत मिळालेलं पत्र त्याच्या सही सहित माहिती अधिकारात काढले आहे , पोलिसात दिलेला कबुली जबाब सुद्धा काढला आहे , पुढे काय करायचे ते कृपया मार्गदर्शन करा .

आपला अडवलेले रास्ता , पुन्हा पोलीस बंदोबस्तात , तलाठी यांचेकडून कडून मोकळा करून घ्या
पोलीस यांना खोटी /चुकीची माहिती दिली अशे आपले म्हणणे असल्यास , आपले इच्छे नुसार पुढील कायदेशीर कारवाई त्या व्यक्ती विरुद्ध करा

सर आमचा गावाला वनीकरण विभागाची जागा आहे
ती जागा आम्हला करारावर किवा भाडे तत्त्वावर पाहिजे
त्या साठी काय करावे लागेल.
सर मदत करा प्लीज.

आदरणीय सर , आमच्या आईच्या नावे अमरावती जिलह्यात जमीन आहे.आईच्या मृत्यून॓तर आम्ही वारस नोंदी साठी तलाठ्याकडे अर्ज व कागदपत्रे दिली.तलाठ्याने सर्व वारसांची नोंद गाव नमुना ६क मध्ये केली व आम्हां सर्व वारसांना नोटिस पाठवली ज्यात कोणाला काही हरकत असल्यास १५ दिवसात कळवावे अन्यता फेरफार मंजूर करण्यात येईल.मला आपल्याला विचारायचे आहे की सदर नोटिस सर्व वारसदारांनी सही करून परत तलाठूयांकडे पाठवणे बंधनकारक आहे का? आम्ही सर्व वारसदार एकाच कुटुंबातील असून मयताशी रक्ताचे नाते आहे व आमचा फेरफार नोंदीस कोणताही विरोध नाही.असे असताना सुद्धा २महिने झाले तरी आमचे नाव ७/१२ ला अजून आले नाही.कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

तलाठी यांनी , सर्व वारस गावात राहत नसतील तर , जागेवर महाराष्ट्र जमीन अधिनियम कलम २३० प्रमाणे जागेवर नोटीस प्रसिद्ध करावी . पंचनाम्याचे ( नोटीस प्रसिद्धी बाबत ) वारस नोंद मंजूर करावी