मुख्य विषय
अ.क्र. मुख्य विषय विषय
सौंदर्य

पिंपल्सवर आयुर्वेदिक उपचार

तारुण्यावस्थेत उत्पन्न होणा-या असल्यानेच त्यांना युवानपिडका किंवा तारुण्यपीटिका मुखदूषिका उत्पन्न होण्याची मुख्यत: चार कारणे आहेत. चेह-यासाठी वापरण्यात येणा-या स्कार्फ, रुमाल धूलिकणयुक्त असू नये. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतल्यास पिंपल्स पूर्णपणे बरे होऊन चेहरा सतेज होऊ शकतो. मुखदूषिका या संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे चेहरा दूषित करणारे. यालाच पर्यायाने युवानपिडका म्हटले आहे. जास्त करून तारुण्यावस्थेत उत्पन्न होणा-या असल्यानेच त्यांना युवानपिडका किंवा तारुण्यपीटिका असेही म्हटले जाते. यालाच आपण पिंपल्स म्हणतो. आयुर्वेदिक औचारामुळे पिंपल्स पूर्णपणे बरे होऊ शकतात.

पिंपल्सची कारणे...

मुखदूषिका उत्पन्न होण्याची मुख्यत: चार कारणे आहेत.

१) जेवणात तिखट, आंबट, खारट व मसालेदार पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे पित्त प्रकोेप होऊन मुखदूषिका उत्पन्न होऊ शकतात.

२) तारुण्यावस्थेत मुलांचे रक्त सळसळत असते. म्हणजेच रागाच्या भरात टोकाची भूमिका घेत असतात. त्यामुळे पित्त प्रकोप होऊन पिंपल्स होऊ शकतात.

३) बाजारात मिळणा-या सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर केल्यामुळे चेह-यावरील त्वचा खराब होऊन पिंपल्स येऊ शकतात.

४) प्रदूषित हवामानामधून धूलिकण चेह-यावर चिकटतात. चेह-यावर अतिप्रमाणात घाम आल्यामुळे डोक्यातील केसांमधील कोंडा चेह-याला चिटकून अस्वच्छतेमुळे पिंपल्स होऊ शकतात.

कशी घ्याल काळजी?

१)जेवणात हिरव्या भाज्या, पोळी, वरण-भात, दूध, तूप असा सात्त्विक आहार घ्यावा.

२)आपल्या मानसिक रोगावर नियंत्रण व संयम ठेवणे. त्याच प्रमाणात नेहमी आनंदी व शांत राहण्याची वृत्ती बाळगावी.

३)रात्रीचे जागरण टाळावे.

४)शक्यतो बाजारात मिळणा-या सौंदर्यप्रसाधनाचा वापर करू नये.

५)दर तासाला चेह-यावर पाणी टाकण्याची सवय करावी. याने चेह-याच्या त्वचेला ओलसरपणा मिळून चेह-याच्या त्वचेमध्ये जिवंतपणा येतो.

६)चेह-यासाठी वापरण्यात येणा-या स्कार्फ, रुमाल धूलिकणयुक्त असू नये. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतल्यास पिंपल्स पूर्णपणे बरे होऊन चेहरा सतेज होऊ शकतो.

सर्वसाधारण माहिती

आरोग्य लोकराज्य विशेष अंक

सर्वसाधारण माहिती

पावसाळ्यातील व्याधी.. औषधे साधी !

काळजी घेऊनही काही व्याधी किंवा व्याधींची लक्षणे उद्‌भवल्यास औषधांचा वेळीच, योग्य मात्रेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा. पोट गच्च झाल्यासारखे, गॅस धरल्याप्रमाणे, करपट ढेकरा येणे अशी लक्षणे असताना आले - सुंठीचा वापर करावा, काढा करून घ्यावा. ताप आल्यावर सुदर्शन घनवटी, सुदर्शन चूर्ण, महासुदर्शन काढा किंवा साधा अगदी तुळशीचा रस घ्यावा भूक वाढण्यासाठी अग्नितुंडी वटी, चित्राकादी वटी, आरोग्यवर्धिनी रस, पाचन सुधारून पोटाच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी या औषधांबरोबर वा स्वतंत्रपणे लवणभास्कर चूर्ण, हिंगवाष्टक चूर्ण, पंचकोटनसव इ. त्रिकूट, शंखवटी, ओवाचूर्ण, सूंठ, गूळ चूर्ण घ्यावे. पोटात कळ येणे, द्रवमल प्रवृत्ती होणे यासाठी शंखवटी, संजीवनी वटी, मोचरस, कर्पूरवटी इ. चा उपयोग करावा. पावसाळ्यात ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर आजाराची काळजी करावी लागणार नाही. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे. घरात पाणी साठविण्याचे हौद, टाक्या, माठ, हंडे, पिंप, बादल्या इ,. भांड्यांच्या अस्वच्छतेमुळे पाणी दूषित होते. ते स्वच्छ ठेवा. साठविलेल्या भांड्यातून अस्वच्छ हाताने किंवा अस्वच्छ भांड्याने पाणी घेतल्यास त्यामुळेही पाणी दूषित होते. शक्यतो चावी असलेले पिंप बरे! नेहमी निर्जंतुक केलेले पाणीच पिण्यासाठी वापरावे.पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरे धुणे हे टाळावे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ अगर नदीजवळ शौचास बसू नये. घराभोवती लहान मुलास शौचास बसवू नये. केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावावी. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घ्यावी. उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. घरातील अन्नपदार्थ झाकलेले असावेत. हात स्वच्छ धुतल्याशिवाय कोणातही पदार्थ खाऊ नये.नासलेले किंवा शिळे अन्न खाऊ नये. दात, जीभ व तोंड हे अवयव दररोज नियमितपणे स्वच्छ ठेवा. सकाळी उठल्याबरोबर चुळा भरून दात नीटपणे घासून तोंडाच्या स्वच्छतेची सुरुवात करावी. चांगली पावडर, पेस्ट, लिंबाची काडी यांचा वापर दात घासण्यासाठी करावा, नियमितपणे आंघोळ करावी. स्वच्छ कपडे वापरावे. बोटाची नखे वाढवू नयेत. नियमितपणे काढावीत. नियमितपणे जेवणापूर्वी तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.नेहमी उकळलेले दूध प्यावे. बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. गृहिणींनी स्वयंपाकापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.फळभाज्या किंवा पालेभाज्या विकणा-या व्यक्तीला जर जंतुसंसर्ग झाला असेल तर त्या फळभाज्या व पालेभाज्यांतून जंतू घरात येतात. हे जंतू अन्न शिजविताना मरतात.ज्या पालेभाज्या न शिजवता कोशिंबिरी करण्यासाठी वापरतात त्या भाज्या मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवल्यास त्यातील अमिबा, जियार्डिया इ. जंतू मरतात आणि जंतूंची अंडी पाण्यावर तरंगतात. हे मिठाचे पाणी एका लिटरमध्ये सहा चमचे मीठ घालून तयार करावे. हे पाणी फेकून देऊन नंतर भाज्या स्वच्छ पाण्यात धुतल्या तर जादा मीठही निघून जाते. म्हणून गृहिणींनी ही दक्षता घ्यावी.

सर्वसाधारण माहिती

सामाजिक संस्कारानेच व्यसनांवर मात

व्यसन म्हणजे कोठल्या तरी मादक, उत्तेजक पदार्थाची सवय. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे दारू. याशिवाय यात भांग, गांजा, अफू ,

गर्द व तंबाखू येतात. व्यसने ही पुरातन आहेत. काही लोक त्याला कडाडून विरोध करतात. समाजकंटक आणि सरकारला व्यसनांपासून आर्थिक उत्पन्न मिळते; पण अगणित कुटुंबांची दैना होते. कित्येक देशांची अर्थव्यवस्था मादक पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून आहे. जगातल्या दहशतवादी चळवळीही यावरच पोसतात. व्यसनांना रोखण्यासाठी केलेली अंमलबजावणी यंत्रणा

मधल्यामध्ये गबर होऊन जाते असा अनेक देशांमधला अनुभव आहे. व्यसन हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे संकट नाही. देशच्या देश या समस्येने त्रस्त आहेत. गावातही आपण दारूगुत्त्यांचे साम्राज्य व राजकारणातील त्यांचे वर्चस्व ओळखून असतो.पूर्वी व्यसने नव्हती असे नाही, पण त्यावर काही लगाम होते. पूर्वी सर्व समाज श्रमावर जगणारा होता, काम नसलेल्या व्यक्तींची संख्या कमी होती. आता आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने दरडोई सुबत्तेचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे पूर्वी दारू कुटुंबाने एकत्र बसून घ्यायचा एक विरंगुळा होता. त्याने फारसे झिंगणे किंवा बेलगाम होणे शक्य नव्हते. व्यसने ही अधिक वैयक्तिक होत गेली तशी ती अनियंत्रित होत गेली. अनेक कुटुंबांत एखादा मनुष्य व्यसनी झाल्याचे उशिरा कळते; तोपर्यंत इतरांना कल्पनाही येत नाही. एखादी व्यक्ती व्यसनांकडे का ओढली जाते? याला अनेक कारणे आहेत. संपन्नता, हलाखी, स्वभाव, दुःखे, निराशा, रिकामपणा, आपली जीवनदृष्टी, संगत वगैरे अनेक कारणे यात येतात. व्यसनांच्या वस्तू जवळपास आणि स्वस्त उपलब्ध असणे हा शेवटी महत्त्वाचा भाग आहे. व्यसनाधीनता हे मानसिक आजारांचेच अंग आहे. केवळ गंमत किंवा आग्रह म्हणून सुरुवात नंतर ती व्यक्ती त्या व्यसनावर पूर्णपणे अवलंबून राहते. संबंधित पदार्थ मिळाला नाही तर त्या व्यक्तीला मानसिक तसेच शारीरिक त्रास होतो. दीर्घ व्यसनाधीनतेने मानसिक बदलही होतात.गरीब आणि श्रीमंत वर्गातही दारू वगैरे व्यसने शिष्टसंमत आहेत. अशिक्षितांइतकीच सुशिक्षितांमध्येही व्यसने भरपूर प्रमाणात आहेत. व्यसनात थोडी अनुवंशिकता असल्याचे दिसते. म्हणजे काही माणसे जन्मतःच थोडी व्यसनाकडे झुकणारी असतात; पण सामाजिक संस्कारांनी यावर मात करता येते.

तोेड व दातांचे आरोग्य :

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. दात, हिरड्या, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आजूबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल. खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरड्या, हिरड्यांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात. मुलांनादेखील दातांचे अनेक आजार असतात. मागच्या पिढीच्या लोकांमध्ये दात-हिरड्यांचे आजार मोठ्या प्रमाणात होतात. अनेकांचे साठीच्या आधीच दात पडलेले असायचे. आताच्या पिढीत दात जास्त वर्षे शाबूत राहतात. याचे मुख्य कारण दातांचा ब्रश. ब्रशमुळे

दात साफ राहतात, कमी आजार होतात आणि दात जास्त टिकतात. दातांचा डॉक्टर नसल्यास काही साधी दंतवैद्यकीय तंत्रे शिकून आपण बरीच कामे करू शकतो.

हृदय

काय हवंय तुम्हाला? शिस्त की पश्चात्ताप? शैलेश परुळेकर - response.lokprabha@expressindia.com Published: Friday, November 28, 2014

अलीकडे हार्ट अ‍ॅटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यासाठी अतिकामाचा ताण हे कारण दिलं जातं. पण जास्त काम करून कुणीही कधीही मृत्यूमुखी पडत नाही. ताणतणाव आणि अनारोग्याच्या मागे आहे ती व्यसनाधीनता आणि व्यायामाचा अभाव.
अगदी तारुण्यात कुणाचेही प्राण जाणे, ही केव्हाही वाईटच गोष्ट आहे. हृदयविकाराने अकाली निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांप्रति माझी केवळ सहानुभूतीच नाही, तर त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे; पण मुळात अशा वेळेस याचा विचार व्हायला हवा की, ही वेळ का यावी एखाद्यावर?
गेली कित्येक वर्षे मी फिटनेसच्या क्षेत्रात आहे. मला नेहमी जाणवते की, आपण आपल्या शरीराला समजून घेण्यास कमी पडतो. शरीर अनेकदा खूप काही सांगायचा प्रयत्न करते आणि कधी आपण ऐकत नाही, तर कधी दुर्लक्ष करतो. अनेकदा त्याचमुळे मग नंतर पस्तावण्याची वेळ येते. म्हणून फिटनेसच्या संदर्भात पहिला नियम कायम लक्षात ठेवा, लिसन टू युवर बॉडी. म्हणजे शरीर काय सांगायचा प्रयत्न करते आहे ते काळजीपूर्वक ऐका. शरीराच्या नियमाला अपवाद नाही. त्याच्यासाठी डॉक्टर, कलावंत, राजकारणी असा फरक नसतो. नियम सर्वासाठी सारखाच. आम्ही कलावंत आहोत किंवा आम्ही क्रीडापटू आहोत, त्यामुळे आमच्या शरीराचे नियम वेगळे असे होऊ शकत नाही.
गेल्या काही दिवसांत हृदयविकाराने अकाली जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा वेळेस अतिकामाचे एक कारण पुढे केले जाते. इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे ठरावे, ते म्हणजे आजपर्यंत जगात कुणीही जास्त काम करून मृत्युमुखी पडलेले नाही. तसे असते तर रस्त्यावर दिवसभर राबराब राबणारे किंवा १००-२०० कि.मी.ची अल्ट्रामॅरेथॉन धावणारे एरवीही सारखे मृत्युमुखी पडले असते. उलट अशा गोष्टींमध्ये माणसाच्या कणखरपणाचा (एन्डय़ुरन्स) कस लागतो. त्याने कुणाचाही मृत्यू होत नाही. आचार्य विनोबा भावे नेहमी म्हणायचे की, कृती असेल तर प्रकृती उत्तम आणि कृती नसेल तर विकृती पाचवीस पुजलेलीच असते. कधी शारीरिक, तर कधी मानसिक विकृती मग तुमचा ताबा घेते.
माणसाचे वय दोन प्रकारचे असते. एक जन्मतारखेनुसार आणि दुसरे शारीरिक. ज्यांचे शारीरिक वय कमी असते ती माणसे वयाच्या ७५व्या वर्षीही मॅरेथॉन धावतात किंवा एव्हरेस्ट सर करतात. प्रश्न असतो तो तुमच्या हृदयाच्या क्षमतेचा. लहानपणापासूनच कधी व्यायाम केलेला नसेल, तर तुमची हृदयाची क्षमता तुलनेने कमी असते.
गेल्या काही महिन्यांमध्ये अभिनयाच्या क्षेत्रातील काही चांगले कलावंत आपण गमावले; पण फक्त अभिनयाचेच क्षेत्र नाही, तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये तरुण व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येऊन ते गतप्राण झाल्याचे आपण पाहिले. एका तरुण सीईओवरही असेच प्राण गमावण्याची वेळ आली. अभिनयाच्या क्षेत्राबाबत बोलायचे तर, यात शारीरिक बळ लागेल असे कष्टप्रद काम नाही. शिवाय अभिनेत्याने ते स्वत:च्या आवडीचे म्हणून स्वीकारलेले असते. अभिनेते, कलावंत या दोघांनाही ते तेवढेच लागू होते. फक्त क्रीडापटूला अंगमेहनत करावीच लागते. अभिनेत्यांच्या बाबतीत चांगले दिसणे किंवा वाटणे ही त्यांची गरज असते. चांगले दिसण्यासाठी बाहेरून मेकअप करणे आणि आतून चांगले दिसणे यात फरक असतो. आवश्यक तेवढी विश्रांती, नियमित व्यायाम व खाण्यापिण्याची पथ्ये पाळलीत, तर अतिश्रम किंवा अतिकाम याने कधीच कुणाचा बळी जात नाही. आपली अनियमितता आणि बेशिस्तच आपल्या मुळावर येते.
सध्या अनेक क्षेत्रांमध्ये जगभर कामावर जाण्याच्या वेळा निश्चित ठरलेल्या आहेत; पण येण्याच्या वेळा मात्र अनिश्चित आहेत. त्याला पर्याय नाही. पत्रकारिता, सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आर्थिक वर्षअखेरीच्या वेळेस सीए, पोलीस आदी सर्व जण भरपूर काम करतात. अनेकदा तहानभूक हरपून काम होते. पायलट व एअरहोस्टेस तर टाइम झोन बदलून काम करतात. त्यावर कामाच्या वेळा कमी करा, असे म्हणणे हा उपाय नाही आणि कामाची वेळ कमी केल्यानंतर तुम्ही थेट घरी जाऊन झोपणार, विश्रांती घेणार का किंवा मग तो वेळ व्यायामासाठी खर्च करणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. की, वेळ अधिक मिळाला म्हणून तो दारू किंवा धूम्रपान करत निवांत घालवणार? एक महत्त्वाची गोष्ट सर्वानीच लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे फावल्या वेळेत आपण काय करतो. त्यावर ठरतं की, आपण किती चांगलं अथवा समृद्ध आयुष्य जगतो.
अभिनेत्यांच्या बाबतीतील एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की, महाविद्यालयात असताना नाटकात काम करायला सुरुवात करतात तेव्हापासूनच अनियमितता जोडली गेलेली असते. जोडीला भरपूर चहा किंवा मग दारू, सिगारेट असे काही तरी व्यसन असते. शिवाय दुसरीकडे व्यायाम शून्य.
अनेकदा त्या क्षेत्रातील असुरक्षिततेचे कारण पुढे केले जाते. असुरक्षिततेमुळे तणाव अधिक असतो, असे म्हटले जाते. खास करून टीव्ही मालिका फारशी चालली नाही, की मग लवकर गुंडाळली जाते किंवा चित्रपटातील अभिनेत्यांच्या बाबतीत असे म्हटले जाते की, दर शुक्रवारी तिकीट खिडकीवर त्यांचं नशीब बदलतं. याचा ताण असू शकतो; पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ताण टाळता येत नाही कुणालाही; पण त्याद्वारे येणारा तणाव मात्र टाळता येतो. तो सहन करण्याची क्षमता व्यायामातून येते.
अधिक कामाचे कारण पुढे करणाऱ्यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा शरद पवार यांची उदाहरणे लक्षात घेतली पाहिजेत. ही मंडळी १६-१८ तास काम करतात. राजकारण हे तर सर्वाधिक असुरक्षित असे क्षेत्र आहे. तिथला तणाव तर इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा सर्वाधिक आहे. अतिकाम हे कारण असेल तर सर्वच राजकारणी हृदयविकाराचे बळी व्हायला हवेत, पण असे होत नाही.
अनेकदा अतिकामासोबत व्यसन आले की मग माणूस संपतो, असा माझा अनुभव आहे. व्यसन माणसाला अर्धे संपवते. कारण व्यसनांमुळे तणावाला सामोरे जाण्याची त्याची क्षमता संपलेली असते.
तणावाच्या बाबतीत म्हटले जाते की, यू कॅ न फेस इट ऑर फ्लाइट. फ्लाइट म्हणजे तणाव विसरण्यासाठी केलेली व्यसने- त्यात दारू, सिगारेट यांचा समावेश होतो. तर सामोरे जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे व्यायाम होय.
फिटनेसच्या या व्यवसायात मला अनेकदा असे लक्षात आले आहे की, तणाव घालवण्यासाठी व्यसन सुरू होते आणि मग त्यातून नव्या प्रकारच्या तणावाला आपण जन्म देतो. व्यसनाधीन माणसाला अनेकदा लैंगिक दौर्बल्यालाही सामोरे जावे लागते. त्यातून आयुष्यात नवा तणाव सुरू होतो. एकातून एक अशी तणावांची साखळीच मग असा माणूस स्वत:साठी निर्माण करतो.
अलीकडे पोलीस भरतीच्या वेळेस तरुण मुलांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या. ज्यांना भरतीसाठी जायचे त्यांना धावावे लागणार याची कल्पनाही असते. ती धाव भारतासारख्या देशात असेल तर कोणत्या वातावरणात होणार याचीही माहीत असते. अशा वेळेस सराव न करता गेल्यानंतर दुसरे काय होणार?
क्रिकेटपटू सकाळपासून संध्याकाळपर्यंत तळपत्या उन्हात एकदिवसीय सामान जीवतोड खेळतात. त्यांचाही सराव नसेल तर मैदानावर मृत्यू होतील. पण मैदानावर तसे होताना दिसत नाही, हे आपण पाहतोच. पोलिसांचे किंवा जवानांचे काम हे शारीरिक श्रमाचे आहे. सराव नसल्याने तशा प्रसंगांना सामोरे जावे लागले. एक साधेसोपे वाक्य आपण लक्षात ठेवले पाहिजे, काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही! त्यावर त्या पोलीस भरतीतील युवकांची धाव सकाळी फारसे ऊन नसताना घ्या, असे म्हणणे योग्य नाही. चोर काय वेळ पाहून चोरी करणार का? किंवा मग दुपार आहे, ऊन आहे म्हणून पोलीस त्यांच्यामागे धावणे टाळणार का? जो सरावामध्ये रडतो तो स्पर्धेच्या वेळेस हसतो, असे आमच्या क्रीडा क्षेत्रात नेहमी म्हटले जाते. स्पर्धेचे निकष लक्षात आले की, पुरेशी काळजी घ्या, हाच उपाय आहे.
खाण्यापिण्याच्या (यातील पिणे हा शब्दप्रयोग पाण्यासंदर्भात वापरलेला आहे) वेळा पाळल्या तरी जीवनशैलीशी संबंधित अनेक विकार तुमच्यापासून दूर राहतील. व्यायामासाठी वेळ नाही, खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळण्यासाठीही वेळ नाही. मग आपल्याकडे वेळ आहे तरी कशासाठी? या साऱ्यांनी एकच प्रश्न स्वत:ला विचारून पाहावा, तुम्हाला काय हवे आहे.. शिस्त की नंतर विकारांनी ग्रासल्यानंतर अथवा बळी गेल्यानंतर होणारा पश्चात्ताप?
तुम्ही स्वत:ला लावलेली शिस्तच तुमचा भविष्यकाळ ठरविणार आहे. खाणेपिणे, व्यायाम यात शिस्त असेल तर आयुष्य निरोगी असेल. हल्ली असेही होताना दिसते की, पैसा, प्रसिद्धी सारे काही हवे असते. त्यासाठी मग आवश्यक असलेल्या विश्रांतीचा बळी दिला जातो. तिचा बळी दिला की ती बळी घेते, हे कायमस्वरूपी मनावर कोरून ठेवा. त्यामुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका, ती माणसाच्या आयुष्यातील आवश्यक गोष्ट आहे. हव्यासाच्या बाबतीत कुठे थांबायचे ते ठरवा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:चे शरीर थोडे समजून घ्या. शरीरासाठी वेळ द्या. शरीराचे ऐकायला शिका.
आपण दररोज खात असलेल्या अनेक पदार्थामधून शरीरात विषारी द्रव्ये अर्थात टॉक्सिन्स तयार होतात. ती वेळीच शरीराबाहेर पडली नाहीत किंवा फेकली गेली नाहीत की माणसाच्या विकारांना सुरुवात होते. त्यासाठी lp07काही साधे उपाय लक्षात ठेवायला हवेत. पाणी भरपूर प्यायला हवे. मसालेदार व गोड पदार्थ टाळायला हवेत. पदार्थ टिकण्यासाठी त्यात अलीकडे प्रीझर्वेटिव्हज वापरलेले असतात असे पदार्थ कटाक्षाने टाळा. अतिगोड व तेलकट पदार्थाना सुट्टी द्या. विषारी द्रव्ये जशी शरीरात तयार होतात तशीच ती प्रदूषणामधूनही येतात. प्रदूषण हे शरीराचे आणि विचारांचे दोन्हींचे असते. या दोन्हींचा निचरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम. व्यायामामुळे वैचारिक निचराही होता, हे आताशा वैज्ञानिक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शरीरामधील विषारी द्रव्यांचा निचरा तर घामातून होतो. स्वत:चेच शरीर स्वत: लक्षात घेतलेत तर कळेल की, निसर्गानेही कशी माणसाला मदत केली आहे पाहा. जेवण्यासाठी एकच एक तोंड आहे पण विषारी द्रव्ये आणि घाण बाहेर टाकण्यासाठी मल, मूत्र, घाम असे पर्याय आहेत. घाम तर अगदी केसांच्या मुळांपासून ते पायापर्यंत सर्वत्र येतो. किती पर्याय आहेत पाहा.
व्यायाम करणे फक्त अक्षयकुमार आणि सलमानलाच जमते बुवा, आपल्याला नाही, असे म्हणण्याचेही काही कारण नाही. असे आपण म्हणतो तेव्हा हे लक्षात येते की, त्यांनी स्वत:ला लावून घेतलेली व्यायामाची शिस्त आपल्याला नको असते. त्यावर त्यांना काय बुवा त्यासाठी पैसे मिळतात, असा युक्तिवाद असतो. त्यावर हे लक्षात घ्यायला हवे की, आपण उलटा विचार करतोय. सुलटा अर्थात सरळ विचार किंवा वस्तुस्थिती असे सांगते की, ते शिस्त पाळतात म्हणून शरीर राखू शकतात आणि म्हणून पैसे मिळतात. म्हणजेच शिस्तीमुळे पैसे मिळतात. शेवटचे आणि तेवढेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिस्त ही विकत घेता येत नाही, ती सवय अंगी बाणवून कमवावी लागते! तीच गोष्ट तंदुरुस्तीची. तंदुरुस्त शरीर विकत घेता येत नाही, ते कमवावे लागते!
शब्दांकन- वैदेही
हे लक्षात ठेवा
* कमीत कमी सात ते आठ तासांची झोप नेहमीच उत्तम.
* कधीही नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
* जेवणाच्या वेळा सांभाळा.
* नाश्ता आणि दुपारचे किंवा रात्रीचे जेवण यात एखादे फळ खा.
* भरपूर पाणी प्या. दिवसभरात आठ ग्लास पाणी आवश्यक असते.
* स्पर्धेचं युग असलं तरी आपली क्षमता ओळखून काम करा.
* मूड चांगला नसतो तेव्हा कार्डिओ व्यायाम प्रकार करा.
* आत्मविश्वास कमी असतो तेव्हा वेट ट्रेनिंग करा. वेट ट्रेनिंग तुमच्यातील रेझिस्टन्स पॉवर वाढवते.
* व्यसनांपासून दूर राहिलात तर अर्धी लढाई आधीच जिंकलेली आहेत. स्वत:ला शिस्त लावा आणि उरलेली लढाईही सहज जिंका.
* लक्षात ठेवा, तणाव हा नि:शब्द शत्रू आहे. चिता माणसाला एकदाच जाळते आणि चिंता मात्र दररोज. त्यामुळे चिंता टाळा. चिंतेवर मात करण्यासाठी व्यायाम करा.